न पडलेल्या पावसाइतकं

काहीही न झाल्यासारखं चालत राहणं

एका अर्थानं सोपं आहे 

आपण ते पूर्वी अनेकदा केल्याची जाणीव असते

एका अर्थानं फार अवघड 

कारण पुन्हा उघड्या रस्त्यावरती 

एका पुढं दुसरं पाऊल टाकताना 

पायाला नवे चटके लागतात

तेव्हा मागच्या उन्हाळ्यातलं शहाणपण 

कामी येत नाही

न पडलेल्या पावसाइतकं उष्ण काही नाही

मी छातीत घेऊन फिरतोय तो पाऊस

तो बरसत नाही 

त्याला जागा हवीय

दोन माणसं आणि त्यांची मोहक निःशब्दता मावेल तेवढी…

आहे तुझ्याकडे? 

*

माझ्याकडे शब्दांशिवाय काही नव्हतं तेव्हा 

तेच या ओसाड जमिनीवर

पीक म्हणून यायचे

आणि तेवढ्यावर जिवंत ठेवता यायचं मन

आकाशात एक ढग आल्यापासून

पावसाची शक्यता निर्माण झाली

आणि माझं शब्दांचं शेत उघडं पडलं 

आता लक्ष सतत ढगाकडे जातं

कमी वस्तू असतात, खरंचंच

न पडलेल्या पावसाइतक्या जीवघेण्या 

*

एकदा पडायला लागला 

की कंटाळा येतो म्हणे पावसाचा 

येत असावा काहींना 

पण उन्हाच्या मुलुखाचे प्रवासी

इतके हलगर्जी नसतात

नको धरून ठेवूस तुझे ढग 

खूप दुरून आलोय

चिखलात माखून रोज विझवतील माझे पाय

माझ्या उन्हाच्या मुलुखाचे अंगार

*

तृष्णाकर्ष लिंक

कविता संग्रह. प्रकाशन वर्णमुद्रा. 2021.

https://www.amazon.in/Trushnakarsha-%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-Tejas-Modak/dp/8195061168/ref=sr_1_1?crid=14YJMPOZCH6TE&keywords=trushnakarsha&qid=1652935175&sprefix=trushnakarsh%2Caps%2C366&sr=8-1

Table for Two

What do they taste like?

Your dreams that fractured before learning to walk,

Those moments that hurt like bits of rock,

The wrecks of your incompleteness,

The words that staggered on your lips

Before you could say them out loud

By when it was too late to even shout.

That leftover piece of what once was,

And old pictures of unopened doors

What do they taste like?

 

Mine taste like bits of burnt wood;

Or a herb with no name;

A lick of fire,

A bee-sting burn,

A spell of rain.

 

You’re welcome to it

If you like that sort of thing.

When you come,

You could carry a bottle of your darkness

And pour me a drink.

Table for two

No Michelin Star.

Just some assorted leftovers

Still warm, bit burnt

Scraps of soul.

Food on the table.

Just some things that will tell us

Who we are.

 

फोटो

आपण एकत्र रचलेली स्वप्न

वाळूची होती

समुद्रकिनार्‍यावरची होती.

ती रचताना आपल्याला फक्त आपण दिसत होतो

आपल्याला ना वाळू दिसली, ना समुद्र

म्हणून, त्या स्वप्नांचं अस्तित्व काही तासांचंच आहे

हे कळलंच नाही आपल्याला.

त्या अल्पायुषी स्वप्नांचे

काही दीर्घायुषी फोटो आहेत माझ्याकडे

जे आता ठेववतही नाहीत

आणि देववतही नाहीत.

नोंद

 

नोंद करायचीच ठरवलीस

तर तुला सगळ्याची करावी लागेल

ते घराचं दार उघडं ठेवण्यासारखं आहे

एकदा उघडं केलं

की हवे नको ते सगळेच पाहुणे आत येणार

 

तुझ्या नकाशावरून बोट सरकवत ने

आणि पुन्हा पहा सगळ्या गोष्टींकडे.

निवडक गोष्टींची रुचकर मिथकं बनलेली असतात

आणि काळांतराने त्याच मिथकांचा तुरुंग होतो

ज्याचा डामडौल ओसरल्यावर

दिसू लागतं डोक्यावरच्या मुगुटाचं कागदपण

आणि अद्याप गळ्याभोवती न जाणवलेला साखळदंड

 

मुक्त व्हायचं असेल

तर स्वागत करावं लागेल त्या सगळ्याचं

जे आपणच पुर्वी लांब सारलं होतं

पुन्हा घासून पुसून रचाव्या लागतील गोष्टी

त्यांच्या नवीन अर्थांसह

मागे कळत नकळत सांडलेल्या गोष्टींना

आपापले कोंब फुटले असतील.

काही गोष्टी तू उदारपणे फुकट देऊन टाकल्या होत्यास

आज कदाचित त्यांचीही किंमत मोजावी लागेल.

जुन्या विजयांचे कदाचित आता

पराभव झाले असतील

काळ्या दगडावरच्या रेषा नाहीशा झाल्या असतील

आणि असंही दिसेल

की विसरलेल्या एखाद्या निर्हेतुक कृतीला

आज अकस्मात आलंय पुण्याचं पीक.

 

सगळ्यालाच हो म्हण.

सगळ्याचाच निरोप घे.

चालताना थोड्या वेळानं लक्षात येईल

बेड्या गळून पडल्याचं.

काही वर्षांनी कदाचित पुन्हा हा प्रवास करावा लागेल

पुन्हा नव्याने नोंदी कराव्या लागतील

नव्या बेड्या पाडाव्या लागतील.

आज मौनानेच स्वीकार कर

मागच्याचा आणि पुढच्याचा.

रिकामा हो.

 

सत्याची कांती इतकी नाजूक आहे

की नुसत्या उच्चाराने तडा जातो तिला

सगळा प्रपंच करून झाला

की मऊ ऊन्हासारखं साकल्य जमा होतं.

कवितेचा गाभा जसा

साचून राहतो पानावरती

तिच्या शेवटानंतरच्या

रिकाम्या जागेत.

 

.

तेजस

 

 

 

 

जिना

दार ओढून घेतलं मघाशी

आणि जिन्यात येऊन बसलो

खिशात हात घालून

किल्ली घेतलीय का हे अजून तपासून पाहिलं नाहीये.

एक मोहकसा अंधार लवंडलाय इथे

आणि त्यात झोकून देतंय मन स्वतःला

मी सोडल्यास जिना रिकामा आहे

जिन्यात एखाद्या बेवारस पिसासारखं तरंगणारं माझं मनही रिकामं आहे.

काही बंद दारं आहेत

काही उघडी

उघडी दारं असलेल्या घरांमधे जावंसं वाटत नाहीये

आणि बंद दारांवरची नजर हटत नाहीये

अशी एक बिनकामी बोच

अंधाराला उगाच एक रोमॅंटिक निळी छटा देतीय

इमारत किती उंच आहे?

आपण कितव्या मजल्यावर आहोत?

माहित नाही.

जिन्यात अधूनमधून काही उसासे पेरून ठेवलेत

ज्याला सापडतात, त्याचे होतात!

पूर्वी मला त्यांचं अप्रूप होतं

आता ते उरलं नाही

पण त्यानी काही ते उसासे सापडणं थांबलं नाहीये

इथे असे काही मजले आहेत

ज्यांवर घरं नाहीत

मैदानासारखे मोकळे आहेत

कधीतरी वेगवेगळ्या मजल्यांवरची आम्ही काही माणसं

इथे जमतो, गप्पा मारतो, अंदाज बांधतो

जिन्यामधे सापडलेले उसासे दाखवतो एकमेकांना

आणि फारच जमून आलं तर

आपोआप सगळे गच्चीवर जातो

आणि तार्‍यांकडे पाहत बसतो.

कोणालाही त्या वेळी खाली पाहायचं सुचत नाही

म्हणून इमारत नेमकी किती उंच आहे

अजून समजलेलंच नाही.

जिन्यात मी इतक्यांदा येऊन बसतो

की मी माझ्यासाठी घरातली एक खुर्ची

कायमची आणून ठेवणार होतो जिन्यामधे

पण पायर्‍यांवर बसलं, भिंतीला टेकून

की जहाजावरची असावीशी बेफिकिरी

वाहायला लागते रक्तात

आणि अधिकच सैल, हलकं, सोपं

वाटायला लागतं ‘असणं’

खुर्ची आली की ती कोणाची हा प्रश्न आला

जिना हा बेसल त्याचा आणि बेसल तोवर असतो

निर्व्याज. उघडा.

आपल्या मनाची सगळी लाज, सगळा त्रागा, उतावळ आनंद, पापांची रांग

स्वतःत शांतपणे सामावू शकणारा.

आपल्याला अथांग होता येत नाही

म्हणून समुद्राचं गूढ माणसाच्या मनातून सुटत नसावं

असंच काहीसं कुतूहल आहे मला जिन्याबद्दल

ना तो खाली जातो ना वर

ना तो घर असतो ना घाट

आणि त्याच्या तटस्थतेचं आकर्षण असूनही

मी तसा नाही या जाणिवेनंच की काय

मी माझा खिसा ठरवून तपासत नाही

आणि तरीही मला त्या किल्लीची आठवण होत राहते…

शक्यतांनी गजबजलेले क्षण

संध्याकाळभर

असं वाटत राहिलं

की आपल्या ग्लास मधल्या रमचा शेवटचा घोट

उगाच तीन चार वेळा ग्लास फिरवत

अजून काही वेळ पुरवतो

तसं काहीसं करावं

या क्षणांचं

 

हे शक्यतांनी गजबजलेले क्षण

 

तू थांबली असतीस तर सोपं गेलं असतं

संध्याकाळ रेंगाळली असती तुझ्या सोबत

पण थांबायला

तू खरंच इथे होतीस

का फक्त त्या शक्यतांच्या गराड्यातली एक शक्यता होतीस

ते माहीत नाही

 

‘सत्य’

– अवजड शब्द आहे, पण आता काहीतरी वजनदार ठेवल्याशिवाय

वार्‍यामुळे इथे तिथे उडणारी पानं स्थिरावायची नाहीत

तर, ‘सत्य’ –

काय आहे?

काय होतं?

याचा शोध लागत नाहीये नीटसा

‘सत्य’ ही सुद्धा एक शक्यताच असल्यामुळे

त्या गराड्यातली नेमकी कुठली

हे समजत नाहीये, इतकंच

 

बाकी ठीक; मी मजेत आहे

सत्य या शब्दाची सालं सोलून पाहतोय

की खरंच आत फळ आहे

की नुसती सालंच आहेत

एकावर एक

आणि आपल्याला सोलायचा कंटाळा आला की थांबून

उरलेली सालं आपण फळ म्हणून खाऊन टाकायची

याचा विचार करतोय

आतल्या आत

किती आत? किती खोल?

कुठला थर? कितवं साल?

मी बोलत राहतो, तू सोलत रहा

आणि पहा काही सापडतंय का

 

पहिल्या पावसात घराबाहेर पळत गेल्यासारखं आहे काहीसं

पाऊस पडतोच आहे आणि आपण पावसात भिजतोच आहोत

पण सगळे थेंब काही आपल्याला स्पर्श करत नाहीत

आपल्या वाट्याला किती आणि कोणते थेंब येतायत?

आपण या एका पावसातल्या

किती शक्यतांनी ओले होतोय?

 

सत्य आणि मिथ्याच्या पलीकडे नेऊन

ठेवणारी गोष्ट म्हणजे आठवण

ती आपली असते फक्त

आपण सोलणं थांबवतो

तेव्हा उरते ती गोष्ट

मला तुझं हसणं आठवतं

जे तू हसायची थांबल्यावर सुद्धा

खूप काळ अवतीभवती रेंगाळतं

अंधार पडल्यावर पायाशी फेसाळत येणारी लाट कोमट लागावी

त्या सारखं काहीसं.

ग्लास रिकामा न करता ती आठवण मी तशीच

खूप वेळ फिरवत राहतो

आणि अजून एक थर सोलून पाहतो

अशा क्षणापर्यंत पोचायला

जिथे तू असशील

आणि त्या क्षणी

इतर कुठलीही शक्यता

शिल्लक नसेल

 

 

IMG_20161105_183228

ऋतु

 

एक मऊसूत मफलर आहे

विकायचा नाहीये, देऊन टाकायचाय

जुना असल्यामुळे त्यावर फुलं आली आहेत

ती त्याची आहेत.

तो काढल्यापासून माझ्या अंगावर काटे आले आहेत

ते माझे आहेत.

 

*

 

वाळत टाकलेल्या रेनकोट खाली

जमा झालेलं थारोळं

आणि रस्त्याच्या खळग्यात जमलेलं डबकं

एकाच पावसाची पिल्लं आहेत.

 

तुला सगळ्यासकट मान्य असेन

तेव्हाच भिजायला ये.

 

*

तेजस

अल्कोहोल

माझ्या काही खाजगी इच्छांचे टवके ,

आसुसलेल्या काही क्षणांची वाळवणे

स्वप्नांची काजळी

निरुपयोगी मलमासारख्या समजुती

जे मिळेल ते मी मनातल्या हातभट्टीत फेकतो

आणि ferment होत राहतं

माझं अल्कोहोल .

काळसर गंधाचं  toxic रंगाचं

 

त्याची चव बदलत राहतेय

तरी आकार तोच  राहतोय बाटलीचा

ज्याचा मला आता कंटाळा येतोय

 

पण जर ते बनवलच नाही

तर त्या खाजगी इच्छा, स्वप्नं, समजुती

उगाच साचत जातील

आणि नाही त्या गोष्टी

खोलीत आलेल्यांना टेबलावर सापडतील

“दारू न पिता फजिती होण्यापेक्षा …. ”

ह्या तत्वावर माझी हातभट्टी सुरु आहे

 

माझ्यातच तयार झालेल्या अल्कोहोलचे घोट घेत मी चालत निघतो

तो रस्ताही मला आता दारूसारखाच बाटलीबंद वाटतोय

मी ती बाटली फोडली

तरी मला चकव्यासारखा तोच रस्ता पुन्हा लागेल

आणि पुन्हा मला मी तिथेच आणि तसाच दिसत राहीन

 

इतर गोष्टींसोबत  आता मी हातभट्टीत

माझी खंत मिसळतोय

त्यात मागच्या फडताळावरचे

न तपासून पाहिलेले राग

आणि काही वाह्यात आकर्षणे ओततोय

नव्याने तयार होणारे अल्कोहोल मला झेपेल का माहित नाही

पण ते त्या बाटलीत ओतलं कि ती बाटली पार वितळून जाणार हे नक्की

आणि ह्या क्षणी

मला तेव्हढी शाश्वती पुरेशी आहे

 

  • तेजस

 

आकर्षण

तुझ्याबद्दलच्या आकर्षणाची कुत्री

मी आतल्या खोलीत कोंडली.

तू आल्यावर ती भुंकत बसली.

 

जे लपवायचं होतं

जगजाहीर झालं.

 

*

 

Tattooच करून घेतला असता

पण मग तो सतत दिसला असता,

पुरावा बनला असता.

 

रोज लावलेलं आकर्षणाचं अत्तर

उडून तरी जातं.

 

*

 

तेजस